मेट्रोच्या कामासाठी विवियानाचा सर्व्हीस रोड दहा दिवस बंद, कोंडी फोडण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेचा प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वडाळा-ठाणे-कासारवडवली या मेट्रो-4 प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असताना कॅडबरी जंक्शन येथे होणारी कोंडी फोडण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने विवियाना मॉलकडे जाणारा सर्व्हीस रोड दहा दिवसांसाठी बंद ठेवला आहे. कॅडबरी सिग्लकडून या मार्गे जाणाऱ्या वाहनांना पूर्व द्रुतगती महामार्गावरील ज्युपिटर हॉस्पिटलसमोरून सर्व्हीस रोडवर प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे विवियाना मॉल चिराग नगरकडे जाणाऱ्या वाहनांना महामार्गावर वळसा घेऊन माघारी यावे लागणार आहे.

वागळे वाहतूक उपविभागाच्या हद्दीत एमएमआरडीएअंतर्गत मेट्रो-4चे काम वेगाने सुरू आहे. कॅडबरी जंक्शनमार्गे पुढे घोडबंदरकडे जाणाऱ्या या मेट्रोच्या मार्गाचे काम करताना पिलर उभारण्याचे कामही नियोजनबद्ध पद्धतीत सुरू आहे, मात्र या पिलर उभारणीच्या कामादरम्यान कॅडबरी जंक्शन येथून विवियाना मॉलकडे जाणाऱ्या सर्व्हीस रोडवर प्रचंड कोंडी होते. त्यामुळे ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विवियाना मॉलकडे जाणारा सर्व्हीस रोड सर्व प्रकारच्या वाहनांसाठी मंगळवारपासून बंद करण्यात आला आहे.

असे आहेत बदल

कॅडबरी जंक्शन ते विवियाना मॉल अथवा लक्ष्मी-चिराग नगरकडे जाणाऱ्या वाहनांना सर्व्हीस रोडवरून प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांना पूर्व द्रुतगती महामार्गाने पुढे जाऊन ज्युपिटर रुग्णालयासमोरील गॅपमधून एंट्री देण्यात आली आहे. तिकडूनच ही वाहने विवियाना मॉल व लक्ष्मी-चिराग नगरकडे जाणार आहेत.