१६ वर्षांपासून फरार असलेल्या दहशतवाद्यासह पाच जणांना अटक; जम्मू-कश्मीर पोलिसांची मोठी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

जम्मू-कश्मीर पोलिसांनी लष्कर-ए-तैयबाच्या (LeT) एका दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये गेल्या १६ वर्षांपासून फरार असलेल्या आणि केंद्रशासित प्रदेशाबाहेर स्वतःचे तळ निर्माण करणाऱ्या अब्दुल्ला ऊर्फ अबू हुरैरा या दहशतवाद्याचाही समावेश आहे, अशी माहिती मंगळवारी अधिकाऱ्यांनी दिली.

या कारवाईत अब्दुल्लासोबतच उस्मान ऊर्फ खुबैब या अन्य एका पाकिस्तानी दहशतवाद्यालाही अटक करण्यात आली आहे. या मोहिमेत जम्मू-कश्मीर पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा सहभाग होता. दोन्ही यंत्रणांनी ताळमेळ ठेवत, दहशतवाद्यांची अचूक माहिती मिळवत ही कारवाई केल्याचे कळते आहे.

तपास पथकांनी जम्मू-कश्मीर, राजस्थान आणि हरियाणासह एकूण १९ ठिकाणांवर छापे टाकले. या ठिकाणांहून अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि साहित्य जप्त केले आहे. या तपासामुळे दहशतवाद्यांना रसद आणि आर्थिक पाठबळ पुरविणाऱ्या लष्कर-ए-तैयबाच्या खोलवर पसरलेल्या जाळ्याचा उलगडा झाल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.