कश्मिरी नेते ‘जन्नत’च्या नावाखाली दुसऱ्यांच्या मुलांचा बळी घेताहेत! – राज्यपाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू -कश्मीरातील धार्मिक, सामाजिक, हुर्रियत आणि राजकीय नेते स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्यांच्या मुलांना ‘जन्नत’च्या मोहात फसवून बळी देत आहेत. कश्मीरात या नेत्यांचा मुलगा अथवा मुलगी लष्कर अथवा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारले गेल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही. किंबहुना या नेत्यांच्या मुलांनी दहशतवादी मार्ग स्वीकारल्याची घटना घडलेली नाही, अशा शब्दांत जम्मू -कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी कश्मीरी नेत्यांवर निशाणा साधला आहे.

कश्मीर खोऱ्यातील फुटीरतावादी आणि राजकीय नेते निष्पाप युवकांना धार्मिक जिहादच्या आणि जन्नतप्राप्तीच्या मोहात फसवत आहेत. हे युवक -युवती मग धार्मिक जिहादला पवित्र कार्य मानून दहशतवादी कारवायांत सहभागी होऊन आपल्या प्राणांची माजी लावत आहेत. असे सांगत या स्वार्थी नेत्यांपासून कश्मिरी जनतेने सावध राहायला हवे, असा सल्लाही राज्यपाल मलिक यांनी कश्मीरी पालकांना व युवकांना दिला. ते श्रीनगरच्या जेवनस्थित पोलीस प्रशिक्षण केंद्रात शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

कश्मीरी नेत्यांनी युवकांना खोट्या आमिषांना बळी पाडणे थांबवावे. कश्मीरी युवकांनीही आता राज्याच्या विकासासाठी मुख्य प्रवाहात सामील व्हावे आणि हिंदुस्थानच्या या स्वर्गाला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी विधायक कार्याला वाहून घ्यावे, असे भावनिक आवाहनही राज्यपाल मलिक यांनी केले. कश्मीरी नागरिकांनीही देशविकासासाठी झटून नवा आदर्श देशापुढे ठेवावा असेही मलिक म्हणाले.

पाकिस्तानने आता दहशतवाद्याच्या घुसखोरीला पाठिंबा देणे थांबवावे, अन्यथा हिंदुस्थानी लष्कराला पुन्हा पाकिस्तानात घुसून पाकमधील दहशतवादी तळ उध्वस्त करावे लागतील, असा इशारा सत्यपाल मलिक यांनी दिला.