काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्रात कायम अस्थिर सरकार ठेवले – जे.पी. नड्डा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात कायम अस्थिर सरकार ठेवले. त्यामुळे राज्य मजबूत असूनही विकास झाला नसल्याची टीका, भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी केली. अंबड येथे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या संमेलनात ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे,शिवसेना सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, महायुतीचे बदनापूर मतदार संघाचे उमेदवार आमदार नारायण कुचे, बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब पाऊलबुध्दे, माजी आमदार विलासराव खरात, नगराध्यक्षा संगीता कुचे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

जे.पी.नड्डा म्हणाले की, पाच महिन्यांपूर्वी तुम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान करून प्रचंड बहूमताने निवडून दिले. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवले, नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या प्रचंड इच्छाशक्तीमुळे जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवले. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील देशभक्त मुस्लिम समाजासह सर्वच समाज खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात येणार आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हिंदुस्थानकडून आहेत की पाकिस्तानकडून हेच समजत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधान मोदी यांच्यामुळे परदेशात हिंदुस्थानची प्रतिमा उंचावली असल्याचे ते म्हणाले. केंद्र व राज्य शासनाने केलेला विकास कामे सांगत महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रचंड मताने मला मतदान करून लोकसभेत पाठवले. तसेच महायुतीच्या उमेदवाराला विधानसभेत पाठवण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी केले.