
सामना ऑनलाईन, मुंबई
शारीरिक स्वास्थ आणि त्याचे आहाराशी असलेले नाते याबाबत संशोधन करून स्वत:ची पद्धती विकसित करणारे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची राज्य शासनाने लठ्ठपणा नियंत्रण मोहिमेसाठी ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी या आशयाचे पत्र डॉ. दीक्षित यांना दिले.
वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत लठ्ठपणा नियंत्रण मोहीम राबविण्यात येत आहे. या विषयातील अनुभव आणि ज्ञान यामुळे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. डॉ. दीक्षित यांनी विकसित केलेली उपचार पद्धतीने देशातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील रुग्णांना फायदा झाला आहे. लठ्ठपणामुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी राबविण्यात येणा-या शासनाच्या मोहिमेअंतर्गत डॉ. दीक्षित ज्ञानाचा उपयोग सामान्य जनतेला होईल, असेही या पत्रात म्हटले आहे. डॉ. जगन्नाथ दीक्षित हे लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोगप्रतिबंधक व सामाजिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख व प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

























































