
खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्रात आज पुन्हा एकदा मृत मगर आढळून आली असल्याने जगबुडी नदीपात्रातील जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 3 डिसेंबर रोजी याच डोहामध्ये एक मगर मृतावस्थेत आढळून आली होती. केवळ 15 दिवसाच्या फरकाने आणखी एक मगर मुरतावस्थेत आढळून आल्याने जगबुडी नदीपात्रातील जलचरांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. गेल्यावर्षीही जगबुडी नदीत एकापाठोपाठ चार मगरी मृत झाल्या होत्या त्यामुळे जगबुडी खाडीत वारंवार होणाऱ्या मगरीच्या मृत्यूचे नेमके कारण काय? असा प्रश्न पर्यावरण प्रेमींना पडला आहे.
3 डिसेंबर रोजी जगबुडी नदीपात्रात मगरीचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले होते. मगरीच्या पिल्लाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबाबत अनेक तर्कवितर्क लढविले गेले होते. नदीपात्रात होणाऱ्या जलप्रदुषणामुळे मगरी मृत होत आहेत असा निष्कर्ष काढत पर्यावरण प्रेमींनी मगरी मृत होण्याचे खापर लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांवर फोडण्यात आले होते.
जगबुडी नदीपात्रात असलेल्या मगरींचा मृत्यू नेमका कशामुळे होतो याचा वनविभागाने शोध घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही मगरींचा मृत्यू होण्यामागचे नेमके कारण काय हे शोधण्याचे आश्वासन दिले होते. मात्र 15 दिवसात नदीपात्रात आणखी एक मगर मृतावस्थेत आढळून आल्याने पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे.




























































