अखेर जगदीप धनखड यांचा पत्ता लागला, उपराष्ट्रपती निवासस्थानातच राहताहेत!

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यापासून ते एकदाही सर्वांसमोर आले नाही. त्यामुळे राजीनाम्यानंतर जगदीप धनखड गेले कुठे असा प्रश्न सर्वांनाच पडलेला होता. विरोधकांकडून अनेकदा याबाबत सरकारला विचारणाही करण्यात आली. मात्र सरकारनेही याबाबत कोणतिही माहिती दिली नव्हती. दरम्यान आता त्यांच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

जगदीप धनखड यांनी 21 जुलैच्या रात्री तडकाफडकी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. आरोग्याच्या कारणास्तव आपण राजीनामा देत आहोत असे त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर ते एकदाही सार्वजनिक रित्या समोर आले नाहीत तसेच त्यांच्या प्रकृतीविषयीही कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांसमोर आली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.

दरम्यान आता जगदीप धनखड हे त्यांच्या दिल्लीतील उपराष्ट्रपती निवासस्थानामध्येच सध्या राहत असल्याचे समोर आले आहे. लवकरच त्यांना नवीन निवासस्थान देण्यात येणार असून तिथे ते शिफ्ट होतील असे सांगण्यात आले आहे.