मुलुंडमधील जगदीश परिहार संशयास्पदरीत्या बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

हिंदू धर्म आवडत नाही म्हणून मी मुसलमान धर्म स्वीकारला आहे असे कुटुंबीयांना फोनवरून सांगत मुलुंड येथील घरातून संशयास्पदरीत्या गायब झालेल्या जगदीश परिहार या तरुणाच्या बेपत्ता प्रकरणाला आज नाटय़मय कलाटणी मिळाली.  मी आखाती धंदा करण्यासाठी आलो आहे असे जगदीश याने कुटुंबीयांना फोन करून सांगितल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. त्यामुळे पाकिस्तानी तरुणीच्या नादात जगदीशने घर सोडल्याच्या वृत्ताला तूर्तास ब्रेक लागला असला तरीही जगदीश कुटुंबीयांशी खोटं का बोलला हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.

मुलुंड कॉलनी परिसरात राहणारा 23 वर्षीय जगदीश परिहार वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. गेले वर्षभर तो फेसबुककर पाकिस्तानी तरुणीच्या संपर्कात होता. याबाबत त्याच्या कुटुंबाने वारंवार त्याला हटकले होते. दोन दिवसांपूर्की अचानक त्याने स्वत:चे फेसबुक अकाऊंट डिलीट करून कम्प्युटरमधील डेटा उडवला. मात्र त्यानंतर अचानक मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून त्याने आपल्या कुटुंबीयांशी शेवटचा संपर्क केला. येथूनच त्याने भाऊ भावेशला शेवटचा फोन करून मला हिंदू धर्म आवडत नाही, इस्लाम धर्म स्वीकारायचा आहे. मला संपर्क करू नये असे सांगितले. त्यानंतर भावेश याने पोलिसांत धाव घेत भाऊ घरातून निघून गेल्याची तक्रार दाखल केली.

जगदीश खरं बोलतो आहे का?

या घटनेला 24 तास उलटत नाहीत तोच जगदीश याने भाऊ भावेश याला फोन करून तो आखाती देशात असून कामानिमित्ताने येथे दाखल झाल्याचे सांगितले. येत्या दोन ते तीन महिन्यांत घरी परत येतो असे सांगून सुखरूप असल्याचे स्पष्ट केले. तरीही जगदीश खरे बोलतोय का, तो खरंच आखाती देशात गेला आहे की पाकिस्तानात याची एटीएस कसून चौकशी करत आहे.

यंत्रणा सतर्क

कल्याणमधील चार तरुण काही वर्षांपूर्की इसिस संघटनेत दाखल होण्यासाठी घरातून निघून गेले होते. त्या घटनेची आठवण या प्रकरणामुळे ताजी झाली. जगदीश बेपत्ता झाल्याने स्थानिक पोलीस यंत्रणा व एटीएसने त्याच्या घरातून हार्ड डिस्क ताब्यात घेतली होती. त्या माध्यमातून तपासाची चक्रेही फिरवण्यात आली. मात्र जगदीशने कुटुंबीयांना फोन केल्याने या प्रकरणावर सध्या तरी पडदा पडला आहे.