जयगडचे सहाय्यक निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली

खंडाळा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणात जयगड पोलिसांची हलगर्जीपणा समोर आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली. जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील याची तात्काळ बदली पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.

खंडाळ्यातील तिहेरी हत्याकांडात जयगड पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दोषींवर कारवाई करू असा इशारा दिला होता. वर्षभरापूवी राकेश जंगम बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आईने केली होती. त्यावेळी जयगड पोलिसांनी योग्य तपास किंवा शोध मोहिम राबवली नाही. दुर्वास पाटील याने राकेश जंगम याचा गळा आवळून खून केला आणि त्याचा मृतदेह आंबा घाटात नेऊन पुरला होता.

त्यापूर्वी सायली बार मध्ये सीताराम वीर याला दुर्वास पाटील आणि त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण केली त्या मारहाणीत सीताराम वीरचा मृत्यू झाला. ही दोन्ही प्रकरणे भक्ती मयेकर हिच्या खूनानंतर उघडकीस आली. भक्ती मयेकर हिचा खूनही खंडाळ्यातील सायली बार मध्ये करण्यात आला होता. या तिहेरी हत्याकांडाचा सुगावा ही जयगड पोलिसांना लागला नाही. त्यामुळे जयगड पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले.

अखेर या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील याची तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली आहे.