
आयुष्यामध्ये कोणीही परिपुर्ण नसल्यामुळे चूक होऊ शकते. जन्मतः कोणीही परिपुर्ण नसल्याने कुठल्यातरी पातळीवर त्यांच्याकडून चुक होते. त्यानंतर कारागृहात जावे लागल्यानंतर आयुष्यभर डाग घेऊन जगावे लागते. बंदी म्हणून शिक्का बसल्यावर समाज जवळ घेत नाही. त्यामुळे एखादी व्यक्ती कारागृहात गेली तर त्याला आयुष्यभर दोष देणे योग्य आहे का ? याचा समाज म्हणून विचार करण्याची गरज असल्याचे मत अप्पर पोलीस महासंचालक तसेच कारागृह महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे .
महाराष्ट्र कारागृह प्रशासन व भोई प्रतिष्ठान,आदर्श मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत असणाऱ्या प्रेरणापथ उपक्रमातंर्गत कारागृहातून शिक्षा पूर्ण करून आलेला बंदी संतोष आतकर याने केशकर्तनालय सुरू केले आहे. त्याच्या व्यवसायाचा लोकार्पण समारंभ आज पार पडला. यावेळी येरवडा कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले, अॅड. प्रताप परदेशी, डॉ. मिलिंद भोई, आदर्श मंडळाचे उदय जगताप, शिरीष मोहिते, महादेव काडगी उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, सुधारसेवा हा कारागृह प्रशानाचे महत्वाचे अंग झाले आहे. त्यादृष्टीने सुधारसेवेसाठी काय करता येईल यासाठी अभ्यास सुरू असून नवीन प्रकल्प शोधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी शासनाने पूर्व पाठिंबा दिला आहे. कोरोनामुळे सध्या कारागृहातील कार्यक्रम बंद आहेत. पण, यावर मात करून व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून कार्यक्रम घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या कैद्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सहकारी बँक विनातारण कर्ज देण्यासाठी पुढे आली आहे. सुधारसेवेचे काम आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी हा आदर्श राष्ट्रीयकृत बँकांनी घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलींद भोई म्हणाले, प्रेरणापथ प्रकल्पाच्या माध्यमातून मागील सहा वर्षात दिग्गज मान्यवरांच्या सक्रिय सहभागातून बंदी बांधवांमध्ये सकारात्मक बदल दिसून आले आहेत. कारागृहातून सुटका झाल्यानंतर संबंधितांना त्यांच्या पायावर उभे राहाण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांची यावेळी माहिती देण्यात आली. हा प्रकल्प देशभरात राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
म्हणून केशकर्तनालयाची करणार सुरूवात
पंढरपूरचे असलेले संतोष आतकरे यांचे पत्नीसोबत वाद झाले होते. त्यातून पत्नीला केलेल्या धक्काबुक्कीत तिचा पायरीवरून पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्यांनी कोर्टात गुन्हा कबूल केला होता. त्यानुसार न्यायालयाने त्यांना 10 वर्षे शिक्षा सुनावली होती. कारागृहात केशकर्तनालयाचे काम मिळाले. कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मंडळ यांनी आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी केशकर्तनालयासारखा व्यावसायास मदत करून वाल्याचा वाल्मिकी केल्याचे त्यांनी सांगितले. जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होऊ नये म्हणून मी आता सांगलीत केशकर्तनालयाच्या माध्यमातून आयुष्याला नवीन सुरूवात करत असल्याचे आतकर यांनी सांगितले.


























































