
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी अमेरिका-इराण शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. इस्लामाबादमध्ये सुरू होणाऱ्या या चर्चेमध्ये पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका निभावत असल्याबद्दल त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.
रमेश यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले की, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा ही दीर्घकालीन शांततेची सुरुवात ठरावी, अशी सर्वांची अपेक्षा आहे. मात्र, 2025 मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असताना आणि हिंदुस्थानने त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे करण्याचे प्रयत्न केले असताना, पाकिस्तानला मध्यस्थाची भूमिका कशी मिळाली, असा सवाल त्यांनी केला.
ते म्हणाले की, 2008 मधील मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या सरकारने पाकिस्तानला प्रभावीपणे वेगळे केले होते. त्याच्या तुलनेत सध्याचे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान मोदींवर टीका करताना रमेश यांनी “Huglomacy”चा उल्लेख करत “Howdy Modi” आणि “नमस्ते ट्रम्प” सारख्या कार्यक्रमांचा दाखला दिला. एवढ्या प्रयत्नांनंतरही अमेरिकेने पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून मान्यता दिली, यावरून हिंदुस्थानला कोणताही राजनैतिक लाभ मिळाला नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच हिंदुस्थानने अमेरिकेसोबत एकतर्फी व्यापार करार केल्याचा आरोपही त्यांनी केला.
याशिवाय, हिंदुस्थानने BRICS+ चे अध्यक्षपद भूषवताना पश्चिम आशियातील संकट सोडवण्यासाठी कोणतीही शांतता मोहीम का राबवली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. इराण, यूएई आणि सौदी अरेबिया हे या गटाचे सदस्य असताना हिंदुस्थानने पुढाकार घेतला नाही, अशी टीका त्यांनी केली.
चीनबाबतही त्यांनी सरकारवर निशाणा साधत, गेल्या 18 महिन्यांतील हिंदुस्थानच्या धोरणातून नेमका काय फायदा झाला, असा सवाल उपस्थित केला. पाकिस्तानला चीनकडून मिळालेल्या पाठिंब्याचाही त्यांनी उल्लेख केला.
दरम्यान, अमेरिका-इराण शांतता चर्चा सुरू होत असताना दोन्ही देशांमधील युद्धविरामाची स्थिती अद्याप नाजूक आहे. या चर्चेद्वारे पश्चिम आशियातील दीर्घकाळ सुरू असलेला संघर्ष थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेहराननेही इस्रायलच्या लष्करी कारवायांवरही या युद्धविरामाचा परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.



























































