
सामना ऑनलाईन । श्रीनगर
कश्मीर खोऱ्यातून जैश ए मोहंमदचे नामोनिशाण मिटले आहे. खोऱ्यात आता जैश ए मोहंमदचा कोणीही नेता उरला नाही. विशेष म्हणजे लष्कराने राबवलेल्या मोहिमेमुळे अतिरेकी संघटनेत जाणाऱ्या कश्मिरी तरुणांची संख्याही घटल्याचा दावा पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी केला.
कश्मीर पोलीस व लष्कराच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी पुलवामा हल्ल्यानंतर खोऱ्यातील सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आली असून, दहशतवाद विरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात आल्याचे सांगितले. चार महिन्यांतच ऑपरेशन ऑलआऊट अंतर्गत 69 अतिरेकी मारण्यात आले तर 12 जिवंत पकडण्यात आले असे ते म्हणाले. विशेष म्हणजे अतिरेकी संघटनेत जाणाऱ्या कश्मिरी तरुणांची संख्याही घटल्याचे ते म्हणाले. जैश ए मोहंमदचा तर पूर्ण खात्मा झाला असून, खोऱ्यात या संघटनेचे नामोनिशाण मिटवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लष्कराच्या वतीने बोलताना जीओसी 15 कॉर्पचे के.जे.एस. धिल्लन यांनी पुलवामानंतर खोऱ्यातील परिस्थिती बदलली असून, अतिरेक्यांच्या विरोधात सुरू असलेली कारवाई थांबणार नसल्याचे ठणकावून सांगितले. खोऱ्यातून जैश ए मोहंमदची पाळेमुळे खणून काढण्यात आली असून, अजूनही संधी गेलेली नाही, कश्मिरी तरुणांनी दहशतवादाचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन धिल्लन यांनी केले.



























































