‘जैश-ए-मोहम्मद’चा हिंदुस्थानात हल्ल्याचा कट, गुप्तचर यंत्रणांचा सतर्कतेचा इशारा

358

जम्मू-कश्मीरमधील कलम-370 हटवल्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानला आता अयोध्येचा ऐतिहासिक निकाल ऐकून मोठा झटका बसला आहे. या निकालामुळे पाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने हिंदुस्थानात हल्ला करण्याची तयारी चालवल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी देशातील सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

अयोध्या ही प्रभू श्रीरामाचीच असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिला. त्यामुळे हिंदू धर्मियांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निकालाचे हिंदुस्थानातील मुस्लीम बांधवांनीही स्वागत केले. देशातील हे धार्मिक सौहार्दाचे वातावरण बिघडवण्याचा कट पाकिस्तानातील ‘जैश-ए-मोहम्मद’सारख्या दहशतवादी संघटनांकडून शिजवला जात असल्याचे वृत्त ‘डार्क वेब’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे. याबाबत मिलिट्री इंटेलिजन्स, द रिसर्च ऍण्ड ऍनालिसीस विंग (रॉ) आणि इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) या गुप्तचर यंत्रणांनी देशातील सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश निशाण्यावर
जैश-ए-मोहम्मद ही संघटना दिल्ली, उत्तर प्रदेश किंवा हिमाचल प्रदेशमध्ये दहशतवादी हल्ला करू शकते, असे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. सरकारने अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आधीपासूनच सर्व राज्यांत हाय अलर्ट जारी केला आहे. आता गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱयाची सुरक्षा दलांनी गंभीर दखल घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या