स्वातंत्र्यदिनापूर्वी घातपाताचा मोठा डाव उधळला, जैशच्या 4 दहशतवाद्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा जवानांना मोठे यश मिळाले असून जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. जम्मू-कश्मीर पोलिसांनी शनिवारी चार दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बेड्या ठोकल्या. स्वातंत्र्यदिनी मोठा घातपात करण्याचा या दहशतवाद्यांचा डाव होता. सुरक्षा जवानांच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळला गेला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यदिनी जम्मू-कश्मीरमध्ये मोटारसायकलद्वारे आयईडी ब्लास्ट करण्याचा या दहशतवाद्यांचा डाव होता. तसेच देशातील अन्य महत्त्वाच्या ठिकाणांचीही रेकी या दहशतवाद्यांनी केली होती. यात अयोध्येमध्ये तयार होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराचाही समावेश आहे. पोलिसांनी दहशतवाद्यांकडून विस्फोटक आणि हत्यारे जप्त केली आहेत.

पोलिसांनी सर्वात आधी पुलवामा जिल्ह्यातून मुंतजिर मंजूर याला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल, एक मॅकझिन, आठ जिवंत काडतुसे, दोन चिनी हातबॉम्ब आणि कथितरित्या वापरला जाणारा एक ट्रक जप्त केला. मुंतजिर मंजूरच्या अटकेनंतर पोलिसांनी जैशच्या आणखी तीन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या, अशी माहिती ‘इंडिया टूडे’ने दिली.

चौकशीमध्ये अटकेतील दहशतवादी इजहार खान याने पोलिसांना सांगितले की, पाकिस्तानमधील जैशचा कमांडर मुनाजीर उर्फ शाहिद याने त्यांना पंजाबमध्ये ड्रोनद्वारे पाडण्यात आलेले हत्यारे जमा करण्याचा आदेश दिला होता. तसेच पानिपत येथील तेल रिफायनरीची रेकी करण्याचेही सांगितले होते. यासाठी तेल रिफायनरीचे व्हिडीओ देखील पाठवण्यात आले होते. तसेच रामजन्मभूमी अयोध्येचीही रेकी करण्याचे काम दहशतवाद्यांना देण्यात आले होते. मात्र तत्पूर्वीच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

अन्य एक दहशतवादी तौसीफ अहमद शाह याने पोलीस चौकशीत सांगितले की, त्याचे काम जम्मूमध्ये घर शोधणे आमि एक सेकंड हँड मोटारसायकल खरेदी करणे होते. याचा वापर आयईडी ब्लास्टसाठी करण्यात येणार होता. यासाठी ड्रोनद्वारे आयईडी जम्मूमध्ये आणण्यात येणार होते. तर चौथा दहशतवादी जहागीर अहमद हा फळ व्यापारी असून तो हिंदुस्थानमध्ये जैशसाठी तरुणांची भरती करण्याचे काम करत होता.