
जयसिंगपूर शहरातील आणखी दोन तरुणांचे स्वॅब चाचणीचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहर व परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या चार झाली आहे. आतापर्यंत सुरक्षित समजल्या जाणार्या शिरोळ तालुक्यात सलग तीन दिवसांत चार रुग्ण आढळल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. शनिवारी पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्यांपैकी एकजण जयसिंगपुरातील बाराव्या गल्लीतील व दुसरा संभाजीनगर येथील आहे.
सोलापूर येथून 13 तरुण 10 मे रोजी जयसिंगपूरला आले होते. त्यांना 12 रोजी इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी संभाजीनगर येथील 20 वर्षीय तरुणाचा रिपोर्ट गुरुवारी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याच्यासोबतच सोलापूरहून आलेल्या जयसिंगपूरलगतच्या संभाजीपूर येथील तरुणाचा रिपोर्टही शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर शनिवारी सकाळी त्यातीलच आणखी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे परिसरातील रुग्णांची संख्या चार झाली असून त्यांच्यावर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सलग तीन दिवसांत चार रुग्ण सापडल्यामुळे जयसिंगपूरसह शिरोळ तालुक्यामध्ये घबराटीचे वातावरण असून जयसिंगपूर शहराचा लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आले आहे.
संभाजीपूरच्या सीमा बंद…
संभाजीपूर येथे शुक्रवारी पहिला कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर शनिवारी सकाळी ग्रामपंचायतीने गावात नव्याने आलेल्यांच्या नोंदी घेण्यास सुरूवात केली. गावाच्या सर्व सीमा बंद करून तेथे तपासणीसाठी कर्मचारी तैनात करण्यात आले. गावात जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. कोरोनाबाधित रुग्णाच्या घरातील सहाजणांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सरपंच अनुराधा कोळी यांनी सांगितले.
जयसिंगपुरातील संभाजीनगरमधील गुरुवारी पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या तरुणाच्या वडिलांची पोलिस ठाणे व लोकप्रतिनिधींकडे ऊठ-बस होती. त्यामुळे काही पोलिस कर्मचारी व लोकप्रतिनिधींशी त्यांचा संपर्क गेल्या काही दिवसांत आला होता. मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांचाही स्वॅब नमुना घेण्यात आला. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील पोलिस व लोकप्रतिनिधींचे धाबे दणाणले असून लक्ष अहवालाकडे लागले आहे.





























































