जेटली यांना कर्करोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
arun-jaitley

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना कॅन्सर झाल्याचे निदान येथील डॉक्टरांनी केले आहे. पुढील उपचारासाठी ते अमेरिकेत न्यूयॉर्कला रविवारी रात्री रवाना झाले आहेत. तेथे एका स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सर्जरी करण्यात येणार आहे. यामुळे 1 फेब्रुवारी रोजी ते संसदेत मोदी सरकारचा हंगामी अर्थसंकल्प सादर करू शकतील का याबाबत शंका आहे. त्यामुळे अर्थ खाते अन्य मंत्र्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.

जेटली यांना मांडीतील कॅन्सर झाला असून हा टय़ुमर आहे. तो शरीराच्या इतर भागातही पसरण्याचा धोका असल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे वृत्त आहे.

जेटली यांच्यावर गेल्या वर्षी मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. मूत्रपिंडासंबंधीच्या आजाराला जेटली हे यशस्वीरीत्या सामोरे गेल्यानंतर ते पुन्हा आपल्या कामात सक्रिय झाले. या आजारपणाच्या काळात त्यांच्याकडील अर्थमंत्रीपद काही काळ रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे दिले होते.

राहुल यांच्या शुभेच्छा!

जेटली यांची प्रकृती बरी नाही हे ऐकून वाईट वाटले. आमचे विचारांचे भांडण रोजच होत असते. मात्र मी आणि माझ्या काँग्रेस पक्षाचे त्यांच्यावर प्रेम आहे. जेटलीजी हे आजारातून लवकर बरे व्हावेत, अशा माझ्या शुभेच्छा आहेत, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून म्हटले आहे.

रविशंकर प्रसादही आजारी

केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांचीही प्रकृती बिघडली आहे. साइनसवरील उपचारासाठी त्यांना दिल्लीत एम्समध्ये दाखल केले असून पल्मोनरी चिकित्सा विभागाच्या अतिदक्षता विभागात त्यांना ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. नाक चोंदले गेल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना एम्समध्ये हलविण्यात आले आहे.