
जालना – संभाजीनगर हायवे रोडवरील बदनापूर जवळील पिरसावंगी फाट्याजवळ राजस्थानी ढाबा येथे एका 60 वर्षीय इसमाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. सदर मृतदेह या धाब्यावर रखवालदार म्हणून काम करणाऱ्या तुकाराम सखाराम शिंदे यांचा असून प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तुकाराम शिंदे यांच्या नातेवाईकांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
बदनापूर येथील रहिवाशी असलेले तुकाराम सखाराम शिंदे (60) हे जालना -संभाजीनगर रोडवर पिरसवंगी फाट्याजवळील राजस्थानी धाब्यावर रखवालदार म्हणून काम करीत होते. 13 डिसेंबर रोजी सकाळी धाब्यासमोर एका खुर्ची जवळ त्यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. ती माहिती मिळताच बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मयत तुकाराम सखाराम शिंदे हे शेकोटी पेटवून बसले असतील. त्या शेकोटीमुळे आग लागून ते होरपळले असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तरी त्यांचे नातेवाईक रामेश्वर अर्जुन शिंदे यांनी पोलिसांना तक्रार अर्ज देऊन माझ्या चुलत्यासोबत काही घातपात झाला किंवा कसे याची सखोल चौकशी कारवाई अशी मागणी केली आहे.




























































