जालन्यातील तरुणीवरील अत्याचाराची सीआयडीच्या एसआयटीमार्फत चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील तरुणीवर मुंबईतील चुनाभट्टीमध्ये अत्याचार झाला होता. त्यानंतर तिच्या उपचारादरम्यान संभाजीनगरमध्ये झालेल्या दुर्देवी मृत्यूच्या घटनेची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी आता सीआयडीच्या (एसआटी) विशेष चौकशी पथकामार्फत होणार आहे.

राज्य महिला आयोगाने याप्रकरणी मुंबई पोलिसांना नोटीस बजावली होती. त्यानुसार आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पीडित तरुणीचे भाऊ तसेच नातेवाईक व सहकार्‍यांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले आणि न्याय मिळवून देण्याचा दिलासा दिला. याप्रकरणी विजया रहाटकर यांनी चुनाभट्टी पोलीस स्थानकाच्या कार्यालयात मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे, अतिरिक्त पोलिस आयुक्त लख्मी गौतम, पोलीस उपायुक्त शशी मीना यांच्या उपस्थितीत बंधू, त्यांचे नातेवाईक आणि सहकार्‍यांशी तपशीलवार चर्चा केली. या चर्चेदरम्यान हा निर्णय घेण्यात आला.

आरोपांची चौकशी

मृत्यू पावलेल्या तरुणीच्या भावाला पोलीस संरक्षण देण्यात येणार आहे. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास करताना मुंबईच्या पोलीस निरीक्षक शिर्के यांनी भावाला नीट वागणूक दिली नसल्याच्या आरोपाचीही चौकशी होणार आहे. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात तज्ञ, निष्णात डाक्टरांच्या पथकामार्फत शवविच्छेदन करण्यात येईल. या शवविच्छेदनाला बंधू आणि त्यांच्या पालकांनी संमती दिलेली आहे. संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडितेच्या कुटुंबीयांना नीट वागणूक दिली नाही,असाही आरोप झाला होता. त्यामुळे या आरोपाचीही चौकशी करण्यात येईल.