विहीर कामगार मजुरांना दरोडेखोरांनी केली मारहाण; सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम लुटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील दहयाळा येथे विहीरीच्या काम करणाऱ्या मजुरांना दरोडेखोरांनी बेदम मारहाण करून मजुरांकडील दागिने, पैसे लुटून एका महिलेला गंभीररित्या मारहाण केल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना 22 मे रोजीच्या पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान हे सर्व मजुर विहिर खोदत असलेल्या शेतामध्येच राहत होते.

अंबड तालुक्यातील चंदनापुरी खुर्द येथील गावाच्या पाणी पुरवठ्याच्या विहीरीचे दहयाळा शिवारात काम सुरू आहे. या विहीरीच्या कामावर घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथील मजूर कामाला होते. 22 मे रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास अज्ञात 10 ते 11 दरोडेखोरांनी मजुर गंगाराम पांडु शिंदे, गंगाराम रामा शिंदे,सुरेखा साहेबराव शिंदे, रेखाबाई राजु शिंदे, अणिता सुभाष शिंदे, सुभाष गंगाराम शिंदे, संतोष गंगाराम शिंदे यांना मारहाण करुन गंभीर जखमी केले असून सुरेखा शिंदे ही महिला अति गंभीररित्या जखमी झाल्याने तिला संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दहयाळा येथे 16 मजुर कामासाठी वास्तव्यास होते. 22 मे रोजी रात्री हे मजुर झोपलेले असतानाच दरोडेखोरांनी लाकडे, दगडांनी या मजुरांवर हल्ला चढवला. हा हल्ला सुरू असताना काही मजुरांनी शेजारच्या उसाच्या पळ काढला, तर काही या हल्ल्यात किरकोळ जखमी आहेत. यावेळी दरोडेखोरांनी नगदी ऐवज 30 ते 40 हजार रुपये तसेच महिलांच्या गळयातील मणीमंगळसुत्रे, नाकातील, पायातील दागिने जवळपास दिड ते दोन तोळे सोने लुटून नेले. तसेच मजुरांकडील पुर्ण मोबाईल फोन ही फोडले. घटनास्थळावरुन दह्याळा गाव
दोन किलोमीटरवर असल्याने तसेच मजुराचे मोबाईल फोडल्याने गावकऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. काही काळानंतर यातील काही मजुरांनी जवळच असलेले चुर्मापूरी गावात असलेल्या पाहुण्यांकडून जाऊन संबंधित गूत्तेदाराला फोन लावून सर्व घटनाक्रम सांगितल्यावर गूत्तेदाराने ही माहिती गोंदी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले खरे. परंतु दरोडेखोर तोपर्यंत फरार झाले होते. पोलीस या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.