भाजपच्या आयात उमेदवारांसमोर निष्ठावंतांच्या बंडखोरीचे आव्हान, जळगावात जुन्या कार्यकर्त्यांनी अधिकृत उमेदवारांविरुद्ध ठोकला शड्डू

महानगरपालिकेची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीच्या लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे, मात्र जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे बिरुद मिरवणाऱ्या भाजपला जळगावात अनेक प्रभागांमध्ये स्वतःचे उमेदवार देता आलेले नाहीत. त्यामुळे आयात केलेल्या उमेदवारांवर भाजपवर निवडणूक लढविण्याची वेळ आली असून या उमेदवारांसमोर निष्ठावंत बंडखोरांचे आव्हान असल्याचे दिसून येत आहे.

भाजपने अनेक प्रभागांमध्ये जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारून बाहेरून आलेल्यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे पक्षाचे अनेक निष्ठावंत माजी नगरसेवक नाराज झाले आहेत. त्यांनी विरोधी पक्षांच्या मदतीने भाजपच्या अधिकृत, पण आयात केलेल्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे.

अपक्षांमुळे प्रस्थापितांची उडाली झोप

अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी मागे न घेतल्यामुळे आता प्रस्थापितांची झोप उडाली आहे. प्रभाग 5 अमध्ये माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्याविरोधात पियूष पाटील, 15 अमध्ये भाजपचे अरविंद देशमुख यांच्याविरोधात गणेश बागडे आणि 13 अमध्ये भाजपच्या नितीप सपके यांच्यासमोर सत्यजित पाटील यांचे आव्हान आहे. पियूष गांधी आणि मयूर कापसे यांच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकत थेट बंडखोरी करून निवडणुकीच्या आखाडय़ात उडी घेतली आहे.