जळगावात फैजपूर-अमोदा मार्गावर भीषण अपघात; नदीत बस कोसळून 2 ठार, 30 जण जखमी

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर-अमोदा मार्गावर रविवारी सकाळी भीषण अपघात घडला. मोर नदीच्या पुलाजवळ इंदोरहून भुसावळकडे येणारी खासगी लक्झरी गणेश ट्रॅव्हल्स कंपनीची बस 15 फूट खोल नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 ते 30 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बसचा चालक नियंत्रण गमावल्याने अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना फैजपूर येथील खाचणे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी भुसावळला हलवण्यात आले आहे.

घटनास्थळी पोलीस, आपत्कालीन सेवा आणि क्रेनच्या साहाय्याने बचाव व मदत कार्य सुरू आहे. बस हटवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

मोर नदी परिसरात गेल्या दोन महिन्यातला हा 28 वा अपघात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.