
राज्यात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असताना जळकोट तालुका मात्र या पासून खूप दूर होता. मात्र मुंबईहून गावी आलेल्या एका पोलीस कर्मचा-याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जळकोट तालुका हादरून गेला आहे. संबंधित रुग्णाचे गाव असलेल्या गव्हाण (ता.जळकोट ) येथे त्यांचे घर असलेला परिसर सील करण्यात आला आहे. गव्हाण येथे प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर भर देण्यात आला असून धोका वाढू नये म्हणून आवश्यक ती दक्षता घेण्यात येत आहे.
आजपर्यंत जळकोट तालुक्यात कोरोना विषाणूचा एकही रुग्ण नव्हता. पण मुंबई पोलीस दलात नोकरीस असलेली एक व्यक्ती (पोलीस कर्मचारी) एक महिन्याची रजा घेऊन आपल्या गावी गव्हाण (ता.जळकोट ) येथे आली होती. 14 मे रोजी दुपारी ते आपल्या गावी आले होते. तथापि, त्यांच्या एका सहका-याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा निरोप मिळाल्यावर त्यांनी उपचाराची दक्षता घेतली.
16 मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, अतनूर येथे ते स्वतः हून गेले. तेथून त्यांना मुलींचे शासकीय वसतिगृह, जळकोट येथे आणून तेथे क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांचा स्वॅब नमुना घेऊन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, लातूर येथे पाठविण्यात आला होता. ता. 17 रोजी रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रात्री उशिरा त्यांना पुढील उपचारासाठी कोविड रुग्णालय, उदगीर येथे हलविण्यात आले आहे.
गव्हाण येथे ग्राम पंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने गावभर निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे, असे ग्रामसेवक बी. जे. माकुरवार यांनी सांगितले. रुग्णाचे घर असलेला परिसर सील करण्यात आला आहे. गावातील 80 घरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. अंटी कोरोना फोर्स द्वारे गावावर लक्ष ठेवण्यात येत आहे. उदगीरचे उप विभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, अहमदपूरच्या उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी शेलार पाटील, तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे यांनी गव्हाण येथे भेट देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनेची पाहणी केली.



























































