जालना बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद – राज्यपालांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ जालना शहरात सर्व पक्षीय रॅली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ 7 डिसेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चा व समविचारी पक्षाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या जालना बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दरम्यान, राज्यपालांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ जालना शहरातून सर्व पक्षीय रॅली काढण्यात आली. दरम्यान जालना तालुक्यासह अंबड, घनसावंगी, मंठा, परतुर, जाफराबाद, भोकरदन, बदनापूर तालुक्यातही कडकडीत बंद पाळून राज्यपालाचा निषेध करण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चा, तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, बसपा, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, जयभीम सेना व विविध सामाजिक संघटनांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी महापुरूषांविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करावे तसेच त्यांची पाठराखण करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा व समविचारी पक्षाच्यावतीने 7 डिसेंबर रोजी जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती.

जालना `बंद’ला जालना शहरातील विविध व्यावसायिक संघटनांसह सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता. यात जालना जिल्हा व्यापारी महासंघ, कापड असोसिएशन, हॉटेल व बार असोसिएशन, कापड मर्चंट असोसिएशन, रेडीमेड कापड असोसिएशन, कृषी व बियाणे विक्रेता असोसिएशन, इलेक्ट्रॉनिक असोसिएशन, कटलरी साहित्य विक्रेता असोसिएशन तसेच जिल्हा वकील संघ,अन्याय प्रतिकार दल, वंजारी महासंघाचा समावेश होता.

बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चा व समविचारी पक्षाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या जालना बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळा व अत्यावश्यक सेवा वगळता जालना शहरातील सर्वच बाजारपेठ बंद होत्या.

निषेध रॅलीचे आयोजन
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चा व समविचारी पक्षाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या जालना बंदचा एक भाग म्हणून जालना शहरातून निषेध रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या निषेध रॅलीची सुरुवात झाली. मूर्ती वेस, नेहरू रोड, फुल बाजार, सावरकर चौक, मामा चौक, महावीर चौक, सुभाष चौक, मस्तगड मार्गे ही निषेध रॅली गांधी चमनवरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर येऊन विसर्जित झाली.