जालना जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ, कुऱ्हाडीने हल्ला करत अंगावरील दागिने व रोख रकमेवर मारला डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सोनक पिंपळगाव येथे अज्ञात चोरट्यांनी शुक्रवार 11 डिसेंबरच्या भल्या पहाटे धुमाकूळ घालत घरावर दरोडा टाकला. चोरट्यांनी सोन्या, चांदीच्या दागिन्यासह रोख रकमेवर डल्ला मारला आहे.

अंबड तालुक्यातील सोनक पिंपळगाव येथील कारभारी गोविंदसिंग बायस (65) या शेतकऱ्याच्या वाड्यात शुक्रवारी भल्या पहाटे पावणे तीन वाजेच्या दरम्यान सात ते आठ अज्ञात चोरट्यांनी भिंतीवरून उड्या मारून प्रवेश केला. घरमालक कारभारी बायस यांच्याकडे असलेला मोबाईल बंद करून बाहेरील संपर्क तोडण्यात आला. त्यानंतर बायस यांना कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर घरात असलेल्या लोखंडी पेटीतील व बायस यांच्या पत्नीच्या अंगावरील सोन्या, चांदीचे दागिने (दोन सोन्याचे कानातील फुल, एक मनिमंगळसूत्र, सोन्याचे चार ग्राम मनी, चांदीच्या दोन पाटल्या, दोन कंकण) तसेच रोख 21 हजार रुपये मिळून एकूण 69 हजार रुपयांवर डल्ला मारला.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर, गोंदीचे वारे, पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक सुग्रीव चाटे, पोलिस हेड कॉन्स्टेबल विष्णु चव्हाण, महेंद्र गायके तसेच जालना येथून चोरट्याचा शोध घेण्यासाठी श्वान पथक तसेच फिंगरप्रिंट यांना पाचारण करण्यात आले होते.

जखमी कारभारी बायस यांना उपचारासाठी अंबडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर हे करत आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार हर्षवर्धन मोरे यांनी दिली आहे.