जालना – वडीगोद्री परिसरात वादळ वाऱ्याचा फटका, पिके आडवी झाली

484

गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असल्याने बाजारपेठ बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अतोनात नुकसान होत आहे. या धक्क्यामधून शेतकरी सावरतो न सावरतो तोच बळीराजापुढे अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. गेल्या चार दिवसात वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन शेतकऱ्याच्या शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. परंतु या नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे.

जालना जिल्ह्यातील वडीगोद्री परिसरात 26 मार्च रोजी दुपारी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती. तसेच 28 मार्चला रात्री दहा वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. हा पाऊस जवळपास एक तास सुरू होता. गेल्या काही दिवसात परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा बसत आहे. अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, आंबा, मोसंबी, डाळिंब, टरबूज, पपई, कांदा, द्राक्ष आदी पिकांची अपरिमित हानी झाली असून सुमारे शेकडो हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला आहे. अवकाळी पावसाने झोडपणे सुरू ठेवले आहे.

रब्बी हंगामाची पिके हाताशी असतांना आणि खरीप हंगामाची पूर्वतयारी तोंडावर असताना झालेले हे नुकसान लाखो शेतकऱ्यांवरील अस्मानी संकट आहे. तसेच अजून पीकहानीचे पंचनामे सुद्धा सुरू झाले नाही. कोणत्याही परिस्थितीत हे पंचनामे तातडीने होण्याची आवश्यकता आहे.गेल्या पंधरा दिवसात शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू करील. मात्र दुसरीकडे कोरोनामुळे बियाणे, खतांची दुकाने बंद आहेत. त्यामुळे आताच उपलब्ध कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या अवकाळी पावसाने मोसंबीची फळगळ मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच द्राक्ष बागा वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट होत असून शेतकऱ्यांचे लाखो रुपये डोळ्यादेखत पाण्यात जात आहे. टरबूज, पपई, डाळिंब या फळ पिकांवरही रोग पडत आहे. शेतकऱ्यांकडे फळभाज्या व अन्य शेतमाल आहे. पण कोरोनाच्या संचारबंदीमुळे विकता येत नसून शेतकऱ्यांवर फळभाज्या फेकण्याची वेळ आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पंचनामे करून आर्थिक मदत लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या