जालन्यात पूराचा हाहाकार, रायघोळ नदीला पूर

1671

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध येथे रायघोळ नदीने रौद्ररुप धारण केले आहे. पूराचे पाणी गावात शिरल्याने घरे, दुकाने, मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. गणेशवाडीत पुराचे पाणी घुसल्याने गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा दिला आहे.

संभाजीनगर जिल्ह्यातील अंजिठा, शिवना, मादणी, खुपटा जळकी आदी परिसरात ढगफुटी प्रमाणे बुधवारी सकाळी पाऊस कोसळत होता. परिणामी भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील धामणा धरण हे शंभर टक्के भरले. त्यामुळे शेलुद, पारध खुर्द व पारध बु.या गावात पाणी घुसले. नदीच्या काठावरील जमिनी वाहुन गेल्या. पारध येथील नदी काठावर राघघोळला अचानक पुर आला. संततधार पावसामुळे पूराच्या पाण्याची पातळी वाढली. पाराश्वर मंदीर,गणेशवाडी, वालसावंगी रोड, हिंदू स्मशान भुमी, मुस्लिम कब्रस्थान व गावाच्या दक्षिणेकडील भाग पाण्याच्या खाली गेला आहे. निसर्गाचे हे रौद्ररुप पाहून गावकरी हादरले असून अनेकजणांनी घरे सोडून सुरक्षित स्थळी जाण्यास सुरुवात केली आहे.

पारधचे सरपंच विनाताई श्रीवास्तव, माजी प.स.सभापती परमेश्वर लोखंडे, माजी सरपंच गणेश लोखंडे, यांनी नदीकाठावरील नागरिकांना सर्तक राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, रायघोळ नदीवरील भोकरदन-पारध रस्त्यावरील पुलावर पारध पोलिसांचा बंदोबस्त असून या परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या