जालन्यातील मठ तांडा येथील शाळेच्या वर्गात गळफास घेऊन शिक्षकाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालन्यातील अंबड तालुक्यातील मठ तांडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोलीत शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ७ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. किरप्पा दिगांबर घोडके (50 रा.नेपातगाव,ओझेवाडी,ता.पंढरपुर, जि सोलापूर हल्ली मु.पाचोड,ता.पैठण,जि.छत्रपती संभाजी नगर) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. किरप्पा घोडके हे सध्या अंबड तालुक्यातील मंठ ताडा येथील जि.प. शाळेवर शिक्षक होते.

सदर आत्महत्या केलेल्या शिक्षकांच्या खिश्यात एक चिठ्ठी आढळुन आली असून या चिठ्ठीमध्ये माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये. बाळा, भैय्या, आरती तुम्हा तिघांना माझ्यामुळे, आर्थिक, सामाजिक, मानसिक त्रास झाला. त्याबद्दल मला माफ करा, आई तुझे उपकार मी फेडु शकलो नाही, मला माफ कर,माझ्या कुटुंबाला त्रास देणार्‍याला सोडु नका असे नमुद केले आहे.

किरप्पा दिगंबर घोडके हे मागील एक वर्षापासून मठ तांडा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मठ तांडा येथे इयत्ता चौथी पर्यंत शाळा आहे. घोडके हे आज एकटेच शाळेवर कार्यरत होते. दुपारी मध्यान्ह भोजनच्या सुट्टी मध्ये सर्व विद्यार्थी वर्गाच्या बाहेर गेल्यानंतर घोडके यांनी हे पाऊल उचल्याच सांगण्यात येत आहे.

घटनेची माहीती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.पी.ठाकरे, एम.गायकवाड,जी.मुढे,एन. परासे यांनी घटनास्थळी धाव घेत सदर घटनेचा पंचनामा केला असुन मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घोडके हे अत्यंत मनमिळाऊ व शांत स्वभावाचे व सर्व विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक होते. त्यांच्या या निर्णयामुळे सर्व विद्यार्थी व पालक वर्गातुन हळहळ व्यक्त होत आहे.