
जालना नगरपालिकेच्या प्रांगणातील पार्किंग झोन मध्ये उभे असलेल्या घंटा गाडीपैकी एका छोटा हत्ती वाहनाला आग लागल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. पालिकेचे कर्मचारी संदिप वानखेडे यांच्या सदरील बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ अग्निशमन दलास खबर दिली. अवघ्या काही मिनिटात अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचून जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
काल 20 सप्टेंबर रोजी रात्री साधारण पावणे अकराच्या सुमारास वाहनास आग लागल्याची घटना घडली. आग लागलेल्या वाहनाच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या वाहनाला सुध्दा आग लागण्यास सुरुवात झाली होती. परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी सतर्कता दाखवून तत्काळ आग विझवल्याने बाजूलाच उभ्या असलेल्या गाड्यांना आगीपासून वाचवण्यास त्यांना यश आले. वायरिंगची स्पार्किंग होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर सगट, राहूल नरवडे, बाबू गवळी, जॉन, विठ्ठल कांबळे आदी. कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. तसेच नगरपरिषदेचे वानखेडे, शोहेब खान, शाकेर खान आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.



























































