
जालन्यातील बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार परिसरातील मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. बाजारभाव घसरल्याने आणि उत्पादन खर्च वाढल्याने हतबल झालेल्या अनेक शेतकर्यांनी आपल्या मोसंबीच्या बागांवर जेसीबी फिरवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात पावसाने अंधाधुंद बरसने सुरू केलेले आहे. त्यामुळे शेत जमीनी खरडून गेल्या आहेत. शेतकर्यांच्या कपाशी, तुर, सोयाबीनसह सर्वच हातून गेले आहे. अशातच आता मोसंबीचे भाव घसरल्याने बागायतदार शेतकर्यांनी आपल्या मोसंबी बागांवर जेसीबी फिरविण्यास सुरूवात केली आहे.
मागील काही वर्षांपासून अतिवृष्टी, वाढलेले खतांचे दर, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारात घसरणारे दर यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. सध्या मोसंबीला मिळणारा दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याने शेतकर्यांचा तोटा वाढला आहे. परिणामी रामभाऊ कान्हेरे या शेतकर्यांनी हताश होऊन मोसंबीची झाडे उपटून टाकली असून त्याच्या जागी इतर पिके घेण्याचा विचार सुरू केला आहे. स्थानिक शेतकरी म्हणाले, “दरवर्षी खत, मजुरी आणि पाण्याचा खर्च वाढत आहे; पण बाजारभाव मात्र घटत चालले आहेत. अशा परिस्थितीत मोसंबीची लागवड टिकवणे अशक्य झाले आहे.”
या संकटाकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन मोसंबी उत्पादक शेतकर्यांना मदत, हमीभाव आणि सवलतीच्या योजनांचा लाभ देण्याची मागणी शेतकर्यांकडून होत आहे. काही ठिकाणी पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकर्यांचे उत्पादन कमी झाले आहे. शिवाय, मोसंबीला योग्य दर न मिळाल्याने शेतकर्यांना खर्चही वसूल होत नाही. काही ठिकाणी तर उत्पादनाची किंमत वाहतूक खर्चालाही पुरत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नाराज शेतकर्यांनी काही ठिकाणी बागा नष्ट करण्याचा निर्णय घेतला असून, गेवराई बाजार परिसरात काही शेतकर्यांनी आपली मोसंबीची झाडे जेसीबीने उपटून टाकल्याची माहिती मिळाली आहे. शेतकर्यांनी शासनाकडे आर्थिक मदत व स्थिर बाजारभावाची मागणी केली असून, योग्य दर न मिळाल्यास मोसंबी उत्पादन बंद करण्याचा इशारा दिला आहे.





























































