Jalna News – समृद्धी महामार्गावर अमोनियम नायट्रेटचा टँकर लीक; प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गावरील गुंडेवाडी शिवारात अमोनियम नायट्रेटने भरलेला टँकर गळती झाल्याची थरारक घटना घडली. प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे एक मोठा संभाव्य स्फोट आणि अनर्थ टळला आहे. गेल्या 24 तासांपासून या ठिकाणी मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (06 एप्रिल 2026) सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास गुंडेवाडी शिवारात हा टँकर लीक होत असल्याचे लक्षात आले. अमोनियम नायट्रेट हे अत्यंत स्फोटक रसायन असल्याने प्रशासकीय यंत्रणा तात्काळ हाय अलर्टवर आली. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना राबवण्यात आल्या. संभाव्य स्फोटाचा धोका टाळण्यासाठी समृद्धी महामार्गावरील संबंधित बाजूची वाहतूक तत्काळ थांबवून वाहने सुरक्षित अंतरावरून वळवण्यात आली. त्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता.

सोमवारी दुपारी 4 वाजल्यापासून जालन्यातील अग्निशमन दलाचे जवान सलग मंगळवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत (24 तासांहून अधिक काळ) घटनास्थळी तैनात होते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली टँकरमधील गळती थांबवण्यात यश आले असून, टँकर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आला आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. नागरिकांनी या घटनेबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.