शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी- आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। जालना

राज्यात दुष्काळ गंभीर असून शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून शिवसेनेला हाक द्या शिवसैनिक मदतीसाठी सदैव तत्पर आहे. आम्हाला शेतीतले काही कळत नसले तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी दिसते. ते अश्रू पुसण्याचे कामे शिवसेना करते,असे प्रतिपादन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. ते जालना येथे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या राष्ट्रीय महापशुधन एक्स्पोमध्ये शेतकऱ्यासमोर बोलत होते.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मराठवाडा पॅकेजमधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर गायी, म्हशी, शेळ्या खरेदी करण्यासाठी धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, उपनेते लक्ष्मण वडले, सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे, जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, युवासेनेचे सिध्दशे कदम, शिवराज बांगर, माजी आमदार संतोष सांबरे, उपजिल्हाप्रमुख पंडीत
भुतेकर, मनिष श्रीवास्तव, रमेश गव्हाड, रावसाहेब राऊत, हनुमान धांडे, युवासेनेचे भाऊसाहेब घुगे, किसान सेनेचे भानुदास घुगे, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, शिवसेना दलित आघाडीचे अ‍ॅड. भास्कर मगरे आदी उपस्थित होते.

यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले की, शासन म्हणून जे काही करायचे आहे ते आम्ही करत आहोत. शिवसेनेचे सगळे मंत्री, खासदार, आमदार शेतकऱ्यांच्या मदतीला उतरले आहेत. मदत म्हणून जे जे करता येण्यासारखे आहे. ते सर्व शिवसेना करत आहे. पण ही मदत कमी पडते. गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात सतत दुष्काळ पडत आहे. 2012 पासून दुष्काळ पडतोय. 2013 मध्ये पडलेल्या दुष्काळात 400 गावांना शिवसेने पाणी दिले. चारा छावण्या उभारल्या. हे करत असतांना अस दिसते की साधारण मार्च-एप्रिलमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. मात्र यावर्षी ऑक्टोंबरपासून दुष्काळाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे.

गेल्या आठवड्यात परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना पशुखाद्य वाटप केले. पाण्याच्या टाक्या दिल्या. जेवढी मदत करता येईल तेवढी शिवसेना मदत करत आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफी नव्हे तर कर्जमुक्ती मिळाली पाहिजे. शेतकरी गुन्हेगार नाही म्हणून त्यांना माफी द्यावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अजुन सरसगट झाली नाही हे वर्षे संपायच्या आधी कर्जमुक्ती झाली पाहिजे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करू शकते यावर बोलणी सुरु आहे. शिवसेनेने 2007 पासून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे हा विषय हाती घेतला आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली तरच हा देश पुढे जावू शकतो आणि शहरात अन्न मिळू शकेल.

पिक विमा योजना अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही. विमा क्षेत्रात खाजगी कंपन्या आल्या आहेत. शेतकऱ्यांना पिक विमा योजनाचे लाभ कसे मिळतील हे बघितल पाहिजे. महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाला सामोरे जातांना सर्वांनी पक्षाचे मतभेद सोडून सर्वच पक्षांनी शेतकऱ्यांसाठी काम केले पाहिजे. शेतकरी जगला तर सर्व जगतील. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी दुधाचे उत्पादन वाढवले तर मराठवाड्यातील दुधाला मुंबई मध्ये मार्केट उपलब्ध करुन देवू असे ही ते म्हणाले. मागच्या वर्षी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विदर्भ-मराठवाड्यातील महिलांना रिक्षाचे परमिट दिले.

शिवसेना म्हणून मदत करण्याचे प्रयत्न तर सुरु आहेतच. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ही वैयक्तिक मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. उद्धवजींच्या फोटोग्राफी प्रदर्शनातून फोटो विकून 6 कोटीचा निधी उभारला. त्यातील प्रत्येक पैसा शेतकऱ्यांसाठी वापरला. जालन्यातही एक कोटी रुपये दिले. शिवसेनेकडून नाला खोलीकरण कामे करण्यात आली आहेत. निवडणुका येत आहे.. म्हणून आम्ही तुमच्यात आलो असे नाही तर गेल्या 5-6 वर्षांपासून आम्ही सतत संवाद साधत आहोत. शेतकऱ्यांना नेहमीच सांगतो की आत्महत्या करु नका, जेथे जेथे मदत करता येईल तेथे तेथे शिवसेना तुमच्या पाठीशी उभा राहिल. सरसगट कर्जमुक्तीसाठी आम्ही झगडू, झगडत राहू, सरसगट कर्जमुक्ती आणल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले.