जीएसटीतील तरतुदींविरोधात कर सल्लागारांच्या आंदोलनास जालना व्यापारी महासंघाकडून पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘जीएसटी’तील तरतुदींविरोधात कर सल्लागारांनी 29 जानेवारीला देशव्यापी आंदोलन पुकारले होते. त्यांच्या आंदोलनाला जालना व्यापारी महासंघाकडून पाठिंबा देण्यात येवून, जीएसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातील प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात कर सल्लागार, व्यापारी, सनदी लेखापाल आणि संबंधित घटक सहभागी होते.

केंद्र सरकराने लागू केलेल्या वस्तू व सेवा करातील जाचक अटी, तरतुदी व किचकट संगणक प्रणाली या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले होते. हिंदुस्थानातील कर सल्लागार, सर्व छोटे-मोठे व्यापारी, उद्योजक यांना कर कायद्यांची पूर्तता करायची असते.

ही प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण व्हावी, या तणावात ते असतात. छोट्या मध्यम व्यापार्‍यांना खरेदी-विक्री, वसूली, बँक लोन, हिशोब, कर कायदे पूर्तता ही सर्व कामे स्वत: करावी लागतात. गेल्या 3 ते 5 वर्षात कर प्रणालीतील तरतुदी अधिकाधिक जाचक झाल्या आहेत. कर खात्यास कर चुकविणार्‍यांना जेरबंद करता येत नाही. म्हणून दर वर्षी किचकट तरतुदी आणि पूर्तता करण्याचे ओझे शासनाने प्रामाणिक करदात्यांवर लादले आहे. त्यात लहान, मध्यम प्रामाणिक व्यापारी भरडले जात आहेत. याच अयोग्य कर कायद्याच्या अंमलबजावणी विरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी आंदोलन करण्यात आल्याचेही म्हटले आहे.

या शिष्टमंडळामध्ये जालना व्यापारी महासंघाचे शहर अध्यक्ष सतीश पंच, व्यापारी महासंघ ग्रामीण अध्यक्ष हस्तिमल बंब, दिपक भुरेवाल, प्रसाद झंवर, प्रविण मोहता, राजकुमार दायमा, आशिष खिंवसरा, सुखदेव बजाज, किशोर कासलीवाल आदिंसह व्यापारीही सहभागी झाले.