Jalna accident – आयशरची दुचाकीला धडक, वडिलांच्या डोळ्यादेखत मुलीसह दोन भाच्यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना शहरातील अंबड चौफुली ते मंठा चौफुली दरम्यानच्या रेल्वे उड्डान पुलाजवळ आयशर आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील तीन मुलांचा जागीचा मृत्यू झाला. नुरैन शेख (वय – 7), आदिबा फातेमा सय्यद शोएब (वय – 5), आयेजा फातेमा शेख (वय – 5) अशी मृतांची नावे आहेत.

रविवारची सुट्टी असल्याने सय्यद शोएब हे आपल्या मुलीसोबत दोन भाच्यांना घेऊन डी मार्टमध्ये खरेदी करण्यासाठी गेले होते. मोटारसायकलवर पुढे एक मुलगी आणि मागे दोन मुलं बसली होती. परत येत असताना रेल्वे उड्डान पुलाजवळ आयशरने ओव्हरटेक करत असताना दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत नुरैन, आदिबा, आयेजा हे तिघे ठार झाले. तर सय्यद शोएब (वय – 40, सर्व रा. तट्टूपुरा मुजाहेद चौक, जालना) हे गंभीर जखमी झाले आहेत. सय्यद शोऐब हे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर जालन्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर आयशरचा वाहन चालक अपघात स्थळापासून गाडीसह फरार झाला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच जालना पोलीस घटनास्थळी पोहचले. कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माने, पोलीस उपनिरीक्षक नागरे यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी भेट दिली. या घटनेच्या पुढील तपास पोलीस करीत असून वाहनासह चालकाचा शोध सुरू आहे.