वीज पडून गोठ्याला लागलेल्या आगीत मुकी जनावरे भस्मसात, जालन्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात शनिवारी पहाटे शेतातील जनावरांच्या गोठ्यावर अचानक वीज पडल्याने गोठ्याला लागल्याची घटना घडली. या आगीत दोन खिल्लारी बैल जोडीसह शेळ्या व एक कुत्रा तसेच गोठ्यातील शेती अवजारे जळून खाक झाली असून यात शेतकऱ्याचे चार लाखांचे नुकसान झाले आहे.

भोकरदन तालुक्यातील गावालगत दगडवाडी शिवारात गणेश हिम्मतराव पांडे यांची जमीन असून त्यांच्या मालकीच्या शेतामध्ये जनावरांचा गोठा आहे. शुक्रवारपासून सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे शनिवारी २९ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अचानक गोठ्यावर वीज पडल्याने त्या गोठ्याला आग लागली. त्यावेळी गोठ्यामध्ये बांधलेले दोन खिल्लारी बैलांची जोडी आगीत जळून मृत पावले असून सोबत आठ शेळ्या व ३० गावरान कोंबड्या आगीत होरपळून मृत्यू पावले आहे.दोन गावरान बैल तसेच दोन शेळ्या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. यासह शेतीचा तुषार संच पाईप शेती उपयोगी साहित्य व अवजारे तेदेखील जळून खाक झाल्या आहेत.

झालेल्या पंचनाम्यानुसार तीन लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटेच्या सुमारास अचानक गावालगत असलेल्या गोठ्याला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी धावाधाव करून सदर गोठ्या मध्ये बांधलेल्या जनावरांची सुटका करण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र बराच वेळ होऊन गेल्यामुळे सदर जनावरे मृत पावली. सदर घटनेची माहिती सरपंच नंदकुमार गिरे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तलाठी यांना कळविली त्यानंतर सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला.