
आंध्र प्रदेशातुन मशिनरी घेऊन गुजरातकडे दोन ट्रक निघाले होते. त्यापैकी एका ट्रकचा चालक सोहनलाल गोकुंद चोरडिया (वय – 56, रा. अजमेर, राजस्थान) यांना ट्रक चालवत असताना हृदयविकाराचा झटका आला. प्रसंगावधान राखत त्यांनी ट्रक रस्त्याच्या कडेला लावला, मात्र त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
आज 8 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास जालन्याजवळ आल्यानंतर सोहनलाल यांज सोबतच्या ट्रकचालकास छातीत दुखत असल्याने मी गोळ्या-औषधी घेतो, असे मोबाईलवरून सांगून पुढे जाण्यास सांगितले होते. तसेच ट्रकमालकालाही फोन करून छातीत दुखत असल्याचे कळविले.
पहाटेच्या सुमारास हा ट्रक जालन्यापासून 5 किमीवर भोकरदन रोडवर समृद्धी मार्गालगत रस्त्याच्या खाली आढळून आला. धावत्या ट्रकमध्येच चालक चोरडिया यांना हृदयविकाराचा झटका आला होता. ट्रकवरील ताबा सुटला होता, तरीही त्यातच त्यांनी प्रसंगावधान राखत ट्रक पलटी होऊ न देता रस्त्याच्या खाली उतरून उभा केला. त्यानंतर त्यांनी स्टेरिंगवरच जीव सोडला.
घटनेची माहिती कळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्यासह संदीप सावळे, पोहेकाँ. वाघमारे, ना.पो.काँ. शिवाजी उबाळे, संजय घुसिंगे, चालक साळवे आदींनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या खाली उतरलेला ट्रक उचलून रोडवर आणण्यात आला आहे.



























































