पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येप्रकरणी 5 जणांना मृत्युदंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येप्रकरणी सौदीच्या न्यायालयाने 8 जणांना दोषी ठरवले. त्यापैकी 5 जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली तर उर्वरित तिघांना 24 वर्षांची शिक्षा सुनावली. दरम्यान, या प्रकरणात 11 जणांवर खटला चालवण्यात आला होता. खशोगी यांची हत्या काहीजणांनी केली होती. या प्रकरणात सर्वांची नावे उघड करण्यात आली नसल्याचे सरकारी वकिलांनी म्हटले आहे.

खशोगी हे ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये स्तंभलेखक होते. 2 ऑक्टोबर रोजी इस्तंबुलच्या सौदी अरब दूतावासाबाहेर ते अखेरचे दिसले होते. त्या ठिकाणी ते आपल्या विवाहाशी संबंधित महत्त्वाचे कागदपत्र घेण्यासाठी गेले होते त्यावेळी सौदी अरबच्या दूतावासात खशोगी यांची सौदीच्या एजंटस्नी गळा दाबून हत्या केल्याचा दावा तुर्कस्तानच्या ‘सबा’ वृत्तपत्राने केला आहे. तुर्कस्तान सरकारने त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी दूतावास पिंजून काढला होता परंतु आजतागायत त्यांचा मृतदेह हाती लागलेला नाही. दरम्यान, सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशावरून खशोगी यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यात येत होता, परंतु त्यांचा या हत्येशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसल्याचे सौदी अरेबियाच्या सरकारने स्पष्ट केले आहे.