जामखेडमध्ये ऑक्सिजनचे 50 सिलिंडर जप्त, महसूल, पोलीस प्रशासनाची कारवाई

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. वेल्डिंगसह इतर कामांसाठी ऑक्सिजन वापरणाऱया 35 ठिकाणांवर महसूल व पोलीस प्रशासनाने छापे टाकून 50 ऑक्सिजन सिलिंडर जप्त केले आहेत. यातील दहा सिलिंडर पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत.

कोविड सेंटरला ऑक्सिजन पुरवठा करणारे काही पुरवठादार जादा किंमत घेऊन खासगी व्यक्तींना ऑक्सिजन सिलिंडर पुरवतात. ते खासगी व्यक्ती वेल्डिंग, ट्रेलर, ट्रॉली यासाठी वापरतात.

जामखेड शहरात काही ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर वापरतात, ही माहिती महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाला मिळाली. यानुसार तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या संयुक्त पथकाने शहरातील सुमारे 35 ठिकाणी धाडी टाकत 50 ऑक्सिजन सिलिंडर जप्त केले. यातील दहा सिलिंडर भरलेले मिळाले. याचा वापर जामखेडमधील आरोळे कोविड सेंटरसाठी करण्यात येणार आहे.

सध्या कोरोनाचे संकट तीक्र झाले आहे. त्यामुळे कोणीही खासगी कामासाठी ऑक्सिजन सिलिंडर वापरू नयेत. ऑक्सिजन सिलिंडरचा वापर प्राधान्याने लोकांचा जीव वाचवणे हाच आहे. त्यामुळे कोणालाही खासगी कामासाठी ते वापरता येणार नाहीत, कोणालाही तशी परवानगी नाही. – विशाल नाईकवाडे, तहसीलदार

आपली प्रतिक्रिया द्या