जामखेड बस स्थानकातील समस्यांसाठीचे उपोषण अखेर मागे

663

जामखेड बस स्थानकातील विविध समस्यांबाबत वेळोवेळी निवेदने व उपोषण करून देखील एसटी महामंडळाकडून कसल्याही प्रकारच्या समस्या सुटल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी तहसील कार्यालयासमोर सुरू केले होते. हे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. आमदार रोहित पवार यांनी हे उपोषण मागे घेण्यात मध्यस्थी केली आहे.

जामखेड शहर हे मराठावाङयाचे प्रवेशद्वार असून जामखेड बस स्टॅण्डवर रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. जामखेड शहर हे तीन तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात शालेय मुलीं जामखेड स्टॅण्डवर प्रवास करण्यासाठी येतात. मात्र या ठिकाणी प्रवाशांच्या आनेक समस्या आहेत. यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी अनेक वेळा निवेदने व उपोषण केले होते. त्यावेळी एस टी अगारप्रमुखांनी बस स्थानक परिसरातील प्रवाशांच्या सर्व समस्या सोडवण्यात येतील, असे अश्वासन दिले होते. मात्र जामखेड बस स्थानकातील प्रवाशांच्या समस्या सुटल्याच नाहीत.

या कारणास्तव अखेर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुरंग भोसले हे तहसील कार्यालयासमोर शुक्रवार दि. २२ रोजी सकाळी अमरण उपोषणास बसले होते. या उपोषणाला अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते नागरिकांनी जाहीर पाठिंबा दिला होता. त्यांनी आपल्या मागण्यांमध्ये म्हटले आहे की, जामखेड बस स्टॅण्डवर एस. टी. महामंडळाने पोलीस चौकी उपलब्ध करून दिली असून ही चौकी असून अडचण नसून खोळंबा आहे त्यामध्ये अद्यापर्यंत पोलिसांची नेमणबक केलेली नाही त्यामुळे प्रवाशांच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महुलासांठी हिरकणी कक्ष हा फक्त नावालाच असुन तो बंदच आहे. सर्वात महत्त्वाचा असलेला प्रश्न म्हणजे महिला व पुरुषांच्या शौचालयाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नवीन शौचालयाचे बांधकाम तत्काळ सुरू करावे, विनापरवाना खाद्य पदार्थ विकणार्‍यांवर कारवाई करावी, बस स्थानकाच्या आत रात्री लाईटची सोय करावी. बसस्थानक परिसरात खासगी वाहनांना व मोटारसायकल आणण्यास बंदी घालावी, बस स्थानक परिसरात वृक्षारोपण करावे, तसेच बस स्थानकात एस टी अधिकार्‍याची कायमस्वरूपी नेमणूक करावी. उपोषण स्थळी नगरचे एसटी अगाराचे लेबर ऑफीसर सचिन भुजबळ व अगारप्रमुख शिरसाठ यांनी भेट दिली आणि आपल्या सर्व समस्या लवकरच सोडवण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

मात्र तरी देखील भोसले यांचे उपोषण सुटले नाही. अधिकार्‍यांना उपोषणकर्ते व पाठिंबा देणार्‍या कार्यकर्त्यांनी चांगलेच धारेवर धरले होते. अखेर याच दरम्यान आमदार रोहित पवार यांचा जामखेड दैरा असल्याने त्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन येत्या दहा दिवसात बस स्थानकातील समस्या सोडवण्याच्या सूचना अगारप्रमुखांना दिल्या. अखेर आमदार रोहित पवार यांच्या मध्यस्थीने सदरचे उपोषण सायंकाळी मागे घेण्यात आले. तसेच अगारप्रमुख महादेव क्षिरसाठ यांनी उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांना लेखी आश्वासनाचे पत्र दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या