जय श्रीराम शुगर कारखान्याच्या जप्त केलेल्या साखरेचा 2 मार्चला लिलाव

85

सामना प्रतिनिधी। जामखेड

तालुक्यातील हळगाव येथील जयश्रीराम शुगर अँग्रो प्रॉडक्ट कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एफआरपी प्रमाणे थकीत 16 कोटी 78 लाख 64 हजार 25 रूपये वसूल केले जाणार आहे. त्यासाठी तहसीलदार विशाल नाईकवडे यांनी सात दिवसांत तीन नोटीसा बजावून जप्त केलेल्या 80 हजार क्विंटल साखरेचा 2 मार्च रोजी लिलाव करण्यात येणार आहे. यातून जमा होणाऱ्या रकमेतून शेतकऱ्यांची ऊस बील रक्कम दिली जाणार आहे.

जयश्रीराम शुगर या खाजगी कारखान्याला 2018-19 सालच्या गाळपासाठी 29 नोव्हेंबर रोजी परवाना मिळाला होता. हंगामात कारखान्याने 1 लाख 34 हजार 213 मेट्रिक टन गाळप केले होते. कारखाना चालू झाल्यानंतर काही दिवसांनी कारखान्याने साखर विक्री करून नोव्हेंबर अखेर बिल शेतकऱ्यांना दिले होते. परंतु या हंगामातील ऊस उत्पादकांना एफआरपी प्रमाणे रक्कम दिली नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. पण कारखान्याने प्रतिसाद दिला नाही.

महिना दीड महिन्यांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी तालुक्यातील खर्डा येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची परिषद घेऊन जयश्रीराम साखर कारखान्याला पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे रक्कम न दिल्यास तीव्र आंदोलन करून साखर आयुक्तांना कारखान्यावर जप्तीची कारवाई करावी यासंबंधी इशारा दिला होता. त्यानुसार साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्याला वेळोवेळी पत्रव्यवहार केला परंतु कारखान्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एफआरपी प्रमाणे देणी 15 टक्के व्याजासह असलेल्या 16 कोटी 78 लाख 64 हजार 25 रूपये रकमेसाठी जप्तीची नोटीस कारखान्याला बजावली. साखर कारखान्याची साखर, मोलॅसिस आणि बॅगस या उत्पादनांची विक्री करावी व शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे रक्कम जिल्हाधिकारी नगर यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्याबाबत कारवाईचे पत्र दिले.

जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार जामखेड यांना साखर आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे पत्र देऊन जयश्रीराम शुगर कारखान्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तहसीलदार विशाल नाईकवडे व त्यांच्या पथकाने 15 फेब्रुवारी 2019 रोजी पहिली नोटीस जयश्रीराम साखर कारखान्याला शेतकऱ्यांच्या ऊसाची थकबाकी 16 कोटी 78 लाख 64 हजार 25 रूपये वसुलीसाठी नोटीस दिली. या नोटीसाला कारखान्याचे जनरल मॅनेजर व्ही. बी. निंबाळकर यांनी कारखान्याकडे 1 लाख 9 हजार 530 क्विंटल साखर उपलब्ध असून शेतकऱ्यांचे देणी व्याजासह देण्यासाठी 80 हजार क्विंटल साखर विक्री करण्यास सहमती दर्शवली.

17 फेब्रुवारी रोजी तहसीलदार विशाल नाईकवडे यांनी जयश्रीराम शुगर कारखान्याला स्थावर जंगम मालमत्ता जप्त करण्याची नोटीस बजावली त्या जप्तीस कारखान्याने 80 हजार क्विंटल साखर उपलब्ध करून दिली. तहसीलदार यांनी ती जप्त केली. तिसरी नोटीस कारखान्याला तहसीलदार यांनी देऊन जप्त केलेल्या 80 हजार क्विंटल साखरेचा 2 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता लिलाव प्रक्रिया ठेवली आहे. या लिलावातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 16 कोटी 78 लाख 64 हजार रुपये 25 रूपये वसूल करण्यात येणार आहेत. तेवढी रक्कम जमा न झाल्यास इतर मालमत्ता जप्त करण्याचे सूचित केले.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पावणे सतरा कोटी थकीत देणी देण्यासाठी साखर आयुक्तांच्या निर्देशानुसार जयश्रीराम शुगर कारखान्याची 80 हजार क्विंटल साखरेचा लिलाव दोन मार्च रोजी लिलाव ठेवला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत देणी पंधरा दिवसांत मिळणार असल्याने ऊस उत्पादकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या