अमरनाथ गुहेतून बाबा बर्फानींचा पहिला फोटो समोर, भाविकांनी घेतले दर्शन

अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होणार आहे. अशातच जम्मू आणि काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेत नैसर्गिकरित्या तयार झालेल्या बर्फाच्या शिवलिंगाचा पहिला फोटो समोर आला आहे. यावेळी शिवलिंगाने मोठा आकार घेतला आहे. शिवलिंगाची उंची सुमारे 7 फूट आहे. लाखो भाविक अमरनाथ गुहेत तयार झालेल्या या बर्फाच्या शिवलिंगाच्या पहिल्या फोटोची वाट पाहत असतात. त्यामुळे आता हे फोटो पाहून चाहत्यांचा आनंद द्विगुणीत होणार आहे.

अमरनाथ यात्रा या वर्षी 3 जुलै 2025 ते 9 ऑगस्ट 2025 पर्यंत चालणार आहे. दरम्यान, जम्मू आणि कश्मीरचे राज्यपाल आणि अमरनाथ देवस्थान मंडळाचे अध्यक्ष मनोज सिन्हा यांनी यावर्षीच्या अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला आहे. अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया 4 एप्रिल 2025 पासून सुरू झाली आहे. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांचे वय 13 ते 70 वर्षांच्या वयोगटातील असणे आवश्यक आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे.

जम्मू कश्मीरमध्ये बस दरीत कोसळली, दोन प्रवाशांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, 15 एप्रिलपासून सुमारे 3 लाख 50 हजार भाविकांनी ऑफलाइन आणि ऑनलाइन माध्यमातून अमरनाथ यात्रेसाठी आगाऊ नोंदणी केली आहे. यावेळी मंडळाने ई-केवायसी, आरएफआयडी कार्ड, ऑन-स्पॉट नोंदणी आणि इतर व्यवस्थांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. अमरनाथची पवित्र यात्रा अधिक व्यवस्थित आणि सुरक्षित राहावी हा यामागचा हेतू आहे.