
जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुला यांनी रविवारी केलेल्या वादग्रस्त विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एलएसीवर जे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे, त्यास केंद्र सरकार जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. तर जम्मू-कश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्याचा जो निर्णय घेतला, त्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ते इतक्यावरच थांबले नाही, तर केंद्र सरकारच्या या निर्णयाला आपले समर्थन नसून चीनच्या मदतीने आम्ही पुन्हा एकदा जम्मू-कश्मीरात कलम 370 लागू करु, असा अजब दावा त्यांनी यावेळी केला आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. यावेळी ते म्हणाले की, केंद्र सरकारने कलम 370 रद्द केल्याने हिंदुस्थान आणि चीनच्या सीमारेषेवर तणाव निर्माण झाला आहे. चीनला हा निर्णय मान्य नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. मी अपेक्षा करतो की, चीनच्या मदतीने आम्ही पुन्हा एकदा कश्मीरमध्ये कलम 370 लागू करू शकतो. 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याचा आम्ही स्वीकार करु शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
























































