जवानांच्या प्रतिहल्ल्यात चार पाकिस्तानी सैनिक ठार

1206

सीमेवर पाकच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त

जम्मूकश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानचा झालेला तीळपापड अजूनही थंड पडलेला नाही. यामुळेच बुधवारी येथील राजौरीच्या केरी सेक्टरमध्ये पाकडय़ांनी सकाळी सात वाजल्यापासूनच तुफानी गोळीबार आणि तोफगोळ्यांचा वर्षाव सुरू केला होता. मात्र हिंदुस्थानी जवानांनीही त्याला तोडीस तोड जवाब दिला. मंगळवारपासून सीमेपलीकडून सुरू असलेल्या गोळीबारानंतर शाहपूर, किरनी आणि बालापूर सेक्टरमध्ये जवानांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात चार पाकडे सैनिक ठार झाले असून पाकिस्तानी सैन्याच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले.

जम्मूकश्मीरमधील कस्वा, मंधारा, इस्लामाबाद, गुंतरिया, काइयां, अपर शाहपूर, लोअर शाहपूर या गावांसोबतच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील गलीपिंडी आणि कंडियार भागात पाकिस्तानी सैनिकांनी तोफगोळ्यांचा वर्षाव केला. हिंदुस्थानी जवानांनीही याला चोख प्रत्युत्तर दिले. या गोळीबाराच्या घटनांमुळे स्थानिकांनी आपापल्या घरातच राहणे पसंत केले. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सीमेपलीकडून गेळीबार सुरू होता. गोलट गावाला लक्ष्य करत पाकडय़ांनी तोफगोळे फेकले. मात्र यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचेही लष्कराने स्पष्ट केले. दहशतवाद्यांना हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरी करता यावी यासाठी पाकडय़ांनी शुक्रवारी नाहक गोळीबार सुरू केला होता. त्यात एक जवान शहीद झाला होता, तर दोन घुसखोरांना यमसदनी धाडण्यात जवानांना यश आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या