
हिंदुस्थानच्या स्थानिक क्रिकेटमधील सर्वोच्च मानाची स्पर्धा असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावून जम्मू-कश्मीर संघाने इतिहास घडविला. तब्बल आठ वेळा विजेतेपद पटकावलेल्या कर्नाटक संघाला त्यांच्याच घरात रोखत जम्मू-कश्मीरने तब्बल 67 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच रणजीच्या झळाळत्या करंडकावर जेतेपदाची मोहोर उमटवली. अंतिम सामना अनिर्णित राहिला, पण पहिल्या डावातील तब्बल 291 धावांच्या आघाडीमुळे जम्मू-कश्मीरला विजेतेपद बहाल करण्यात आले. रणजीचे विजेतेपद पटकावणारा तो 19 वा संघ ठरला. गेल्या दशकात विदर्भ, मध्य प्रदेशसारख्या तुलनेने नवख्या संघांनी आपली छाप सोडली होती.
याआधी जम्मू-कश्मीरने 2013-14, 2019-20 आणि 2024-25 हंगामात उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. मागील हंगामात केरळविरुद्ध पहिल्या डावातील एका धावेच्या पिछाडीमुळे जम्मू-कश्मीरचे उपांत्य फेरीचे स्वप्न भंगले होते. यावेळी मात्र त्यांनी चक्क जेतेपदाचे स्वप्न सत्यात उतरविले. 1959 पासून या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या संघाने तब्बल 67 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हे ऐतिहासिक यश संपादन केले. या ऐतिहासिक जेतेपदाबद्दल जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी संघाला दोन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. राज्यातील क्रिकेटच्या उभारणीसाठी हे विजेतेपद मैलाचा दगड ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जम्मू-कश्मीरने पहिल्या डावात 584 धावा उभारल्या (शुभम पुंदीर 121, यावर हसन 88; प्रसिध कृष्णा 5/98), तर दुसऱया डावात 4 बाद 342 धावांवर डाव घोषित केला (कामरान इक्बाल 160, साहिल लोत्रा 101; प्रसिध 2/42). कर्नाटकचा पहिला डाव 293 धावांत आटोपला. (मयंक अग्रवाल 160; आकिब नबी 5/54). त्यामुळे पहिल्या डावातील भक्कम आघाडीच्या जोरावर जम्मू-कश्मीरने विजेतेपदावर आपले नाव कोरले.






















































