आम्ही ‘नाझी’ प्रेमी नाही, युरोपियन महासंघाच्या शिष्टमंडळातील खासदाराने ओवेसींना सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

युरोपियन महासंघातील (European Union) लोकप्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ सध्या जम्मू-कश्मीरच्या दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळाने बुधवारी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये बोलताना त्यांनी हिंदुस्थानी हा शांतीप्रिय देश असल्याचं म्हटले आहे. आमचा हा दौरा राजकीय असल्याचा शिक्का मारण्यात आला होता, मात्र या आरोपात तथ्य नसल्याचं या शिष्टमंडळात सहभागी झालेल्या खासदारांनी म्हटले आहे. आम्ही इथे फक्त पाहणी करण्यासाठी आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलो आहोत असं त्यांनी सांगितलं आहे. कश्मीरमधून कलम 370 रद्द करणे हा हिंदुस्थानचा अंतर्गत मुद्दा असल्याचंही या खासदारांनी म्हटले आहे.

या दौऱ्यापूर्वी AIMIM पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शिष्टमंडळातील सदस्य हे ‘नाझी’प्रेमी असल्याची टीका केली होती. हा प्रश्न जेव्हा पत्रकार परिषदेत विचारण्यात आला तेव्हा शिष्टमंडळातील सदस्यांनी आम्ही ‘नाझी’ प्रेमी अजिबात नाही जर आम्ही असतो तर आम्हाला जनतेने निवडूनच दिलं नसतं असं उत्तर दिलं आहे. या खासदार सदस्यांनी ओवेसी यांच्या टीकेवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

हिंदुस्थानच्या दहशतवादाविरोधात लढाईला या शिष्टमंडळाच्या दौऱ्याने आणखी बळ मिळालं आहे. दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये आम्ही हिंदुस्थानसोबत आहोत असं या शिष्टमंडळाने ठामपणे सांगितलं आहे. दहशतवादाचा मुद्दा हा युरोपातील देशांसाठीही चिंतेचा विषय बनला असल्याचेही त्यांनी नमूद केले. कश्मीर दौऱ्याबाबतचा अहवाल आपण आपल्या देशातील संसदेसमोर सादर करणार नसल्याचं या खासदारांनी म्हटले आहे. या शिष्टमंडळातील सदस्यांनी आपल्याला जास्त काळ कश्मीरमध्ये राहाता आलं नाही आणि इथल्या लोकांशी जास्त काळ संवादही साधता आला नाही असं म्हणत खंत व्यक्त केली आहे.

29 ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी युरोपियन महासंघातील खासदारांचे शिष्टमंडळ कश्मीरमध्ये पोहोचलं होतं. या शिष्टमंडळाने कश्मीरमधल्या जनतेशी, अधिकाऱ्यांशी, सरपंचांशी संवाद साधला होता. या सदस्यांनी दल सरोवरात बोटींगचा आनंदही लुटला होता. यानंतर या सदस्यांपुढे हिंदुस्थानच्या सैन्य दलाने कश्मीरमधल्या परिस्थितीसंदर्भात एक सादरीकरणही केले होते. श्रीनगरला जाण्यापूर्वी या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली होती.

या दौऱ्यावर विरोधकांनी सुरुवातीपासून नाराजी व्यक्त केली होती. देशातील लोकप्रतिनिधींना कश्मीरमध्ये जाण्यास मनाई केली जाते, मात्र विदेशी खासदारांना तिथे जाण्यास मुभा दिली जाते हे धोरण बरोबर नाही असं म्हणत काँग्रेस नेत्यांनी या दौऱ्यावर टीका केली होती.