जम्मू-कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात चकमक, हिजबुलच्या 4 दहशतवाद्यांना कंठस्नान

714

संपूर्ण देश कोरोना व्हायरसचा सामना करत असताना सीमेवरील जवान मात्र दोन्ही आघाडीवर लढताना दिसत आहेत. शनिवारी जम्मू-कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील मंजगाम येथे सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील हर्दमनगुरी बटपोरा येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. यानंतर स्थानिक पोलीस, स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि लष्कराच्या राष्ट्रीय रायफल दलाने या भागात संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. परिसराला घेराव घातल्यानंतर दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. या चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. हे सर्व दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित होते. या दहशतवाद्यांनी नुकतीच 4 नागरिकांची हत्या केल्याचे समोर आले.

याआधी 15 मार्चला अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी
लश्कर-ए-तोएबाच्या 4 दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. वटरीग्राम गावातील एका घरात हे दहशतवादी लपून बसले होते. सुरक्षा जवानांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी गोळीबार केला. यावेळी उडालेल्या धुमश्चक्रीत दहशतवादी ठार झाले. तसेच याच दिवशी सोपेर जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून पिस्तुल, जिवंत काडतुसे आणि हत्यारांचा साठा जप्त करण्यात आला होता.

2020 मध्ये 9 वेळ उडाली चकमक
2020 या वर्षात गेल्या 3 महिन्यात कश्मीर खोऱ्यात 9 वेळा चकमक उडाली. या चकमकीत 25 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले, तर 3 जवान शहीद झाले.

आपली प्रतिक्रिया द्या