जम्मू कश्मीरमध्ये सैन्याला मोठं यश, लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला अटक

हिंदुस्थानी सीमेवर तैनात असलेल्या सैन्याला एक मोठं यश मिळालं आहे. पाकिस्तानकडून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा बेत सैन्याने हाणून पाडला असून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, सीमेलगतच्या भागांमध्ये होणाऱ्या घुसखोरीची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. त्यानंतर साधारण 18-19 सप्टेंबर दरम्यान सैन्याने शोधमोहीम सुरू केली होती. मंगळवारी त्या मोहिमेला यश आलं.

गेल्या सात दिवसांत सैन्याने सात दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. पण, या मोहिमेत अली बाबर नावाचा लश्कर ए तोयबाचा तरुण दहशतवादी जिवंत पकडण्यात सैन्याला यश आलं. अली बाबर हा अवघ्या 19 वर्षांचा आहे.

पाकिस्तानातील पंजाब प्रांतातल्या दिपलपुरचा रहिवासी असलेला अली बाबर फक्त सातव्या इयत्तेपर्यंत शिकला आहे. पण, कमी वयातच त्याने दहशतवादाचा मार्ग स्वीकारला.

2019मध्ये त्याने खैबर पख्तनुवा येथे दहशतवादाचं प्रशिक्षण घेतलं आणि तो हिंदुस्थानची सीमा पार करून इथे आला. त्याच्यासोबत पाकिस्तानचा दहशतवादी अतीक उर रहमान देखील होता. अतीकने त्याला आईच्या इलाजासाठी 20 हजार रुपये देण्याचं कबूल केलं होतं.

त्यामुळे अतीकसोबत काम करण्यासाठी अली तयार झाला. मात्र, सैन्यासोबतच्या चकमकीत अतीक मारला गेला. त्यानंतर त्याच्यासोबत आलेल्या अलीने आत्मसमर्पण केलं.

आपली प्रतिक्रिया द्या