
कश्मीरमध्ये 370 कलम हटवल्यानंतर घालण्यात आलेल्या इंटरनेट, मोबाईलबंदीमुळे सामान्य कश्मिरींची सगळी भिस्त लँडलाईनवर आहे. मात्र, लोकांकडे संपर्कासाठी कोणतीही सुविधा नसल्यामुळे त्याचा गैरफायदा घेणे काहींनी सुरू केले आहे. लँडलाईनवर बोलण्यासाठी ते सर्वसामान्यांकडून मिनिटाला 50 रुपये घेत आहेत. कश्मीरमध्ये निर्बंध लादल्यानंतर आज 51 दिवस झाले आहेत. स्वतःच्या कुटुंबीयांशी आणि नातेवाईकांना बोलण्यासाठी कश्मिरींना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर काहींनी नव्याने फोन घेतले आहेत. कश्मीरमध्ये बीएलएनएलचे 43 हजार 400 लँडलाईन फोन सुरू आहेत. यातील 4 हजार फोन नवीन आहेत.



























































