कश्मीरमध्ये बर्फवृष्टीत दोन जवान शहीद

440

जम्मू-कश्मीरमध्ये बुधवारपासून सुरू झालेल्या जोरदार बर्फवृष्टीचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. या बर्फवृष्टीदरम्यान झालेल्या हिमस्खलनात दोन जवान शहीद झाले. दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी सहाजणांचा मृत्यू झाला. तसेच श्रीनगर विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली असून श्रीनगर-जम्मू महामार्ग ठप्प झाला आहे.

बर्फवृष्टीदरम्यान पुढचे काहीच दिसेनासे झाल्याने लानगेट परिसरात लष्कराच्या गाडीला अपघात होऊन त्यात भीमबहादूर आणि अखिलेश कुमार हे जवान शहीद झाले. दुसरीकडे कुपवाडा परिसरात लष्कराच्या गाडीतून माल उतरवणारे मंजूर अहमद आणि इशाक खान हे दोघे बर्फाचा डोंगर कोसळून झालेल्या दुर्घटनेत ठार झाले. तसेच श्रीनगरमध्ये विद्युत विभागाचा एक कर्मचारी आणि हबाक परिसरात एका नागरिकाचा मृत्यू झाला. श्रीनगर विमानतळावरील उड्डाणांना बुधवारपासून फटका बसला आहे. गुरुवारी सकाळी धावपट्टी साफ करण्याचे हाती घेण्यात आले होते, मात्र बर्फवृष्टी सुरूच राहिल्यामुळे ते काम पूर्ण होऊ शकले नाही.

गुलमर्गला सर्वाधिक फटका; श्रीनगरचा संपर्क तुटला
श्रीनगरच्या गुरेज, माछिल, केरन आणि तंगधार या परिसरांना जोडणाऱया रस्त्यांना बर्फाने पूर्णपणे आच्छादले आहे. बर्फवृष्टीमुळे महामार्गावर जवळपास 2 हजार गाडय़ा अडकल्या असून श्रीनगरचा संपर्कच तुटला आहे. बर्फवृष्टीचा सर्वाधिक फटका गुलमर्गला बसला असून येथे सर्वाधिक म्हणजेच 62 सेमी. इतकी बर्फवृष्टी झाली.

आपली प्रतिक्रिया द्या