
पहलगाममध्ये हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये युद्धपातळीवर दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू आहे. सुरक्षा दलाने पूंछमध्ये रविवारी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांकडून दोन रायफल आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली.
तारिक शेख आणि रियाझ अहमद अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आजमाबाद येथील शेखच्या घरावर छापा टाकला. छापेमारीत शेखला त्याचा साथीदार अहमदसह अटक केली. दोघांची चौकशी केल्यानंतर, पोलिस पथकाने जालियन गावातील शेखच्या भाड्याच्या निवासस्थानी छापा टाकला आणि शस्त्रे जप्त केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.