जामतारा स्टाइलने करत होते फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परदेशात नोकरी लावतो सांगून महिलेची 15 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना पश्चिम विभाग सायबर पोलिसांनी कोलकाता येथून गजाआड केले. मोहम्मद जाफर अन्वर अली शेख ऊर्फ पप्पू मोहम्मद इस्तियाक अन्सारी अशी त्या दोघांची नावे आहेत. अन्सारी हा बँक खाते वापरायला देत असायचा तर पप्पू हा बनावट आवाज काढून फसवणुकीचे फोन करायचा.

तक्रारदार या महिला असून त्या वांद्रे परिसरात राहतात. गेल्या वर्षी त्यांनी फेसबुकवर एक जाहिरात पाहिली. ती जाहिरात पाहिल्यावर परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळत असल्याने महिलेने त्या नंबरवर संपर्क साधला. त्यानंतर काही दिवसातच आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. याप्रकरणी तिने पश्चिम विभाग सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

परिमंडळ-9 चे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. प्रभारी पोलीस निरीक्षक सविता शिंदे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक विशाल गायकवाड, उपनिरीक्षक अनिकेत कडू, अमित पांडे, राजेश खुलानी, संग्राम जाधव यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान त्या नंबरची आणि बँक खात्याची पोलिसांनी माहिती काढली. त्यानंतर पोलिसांचे पथक कोलकाता येथे गेले. तेथून शेख आणि अन्सारीला ताब्यात घेतले.